टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात आलेल्या रेमल वादळाने मोठ्या प्रमाणात घरावरील पत्रे उडाले तसेच झाडे व विजेचे पोल उन्मळून पडले. काही ठिकाणी वीज पडून जनावरे मेल्याची नैसर्गिक घटना घडल्याने सदर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाकडून मदत मिळावी हा उदात्त हेतु ठेवून आ.समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा आयोजित केला होता.
या पाहणी दौर्या दरम्यान पंचनामे करणेकामी पाठखळ येथील मंडल अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक आदी शासकीय जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने आ.आवताडे यांनी थेट गटविकास अधिकारी यांना फोन करुन संबंधीत ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केल्याने कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
दि.27 मे रोजी आ.समाधान आवताडे यांनी नैसर्गिक आपत्ती कोसळलेल्या विविध ठिकाणी सकाळी 9 पासून ग्रामीण भागाचा दौरा सुरु केला. पाठखळ येथे आल्यानंतर त्यांना मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामसेवक हे जबाबदार शासकीय कर्मचारी कोणीच नुकसानीचे पंचनामे प्रसंगी उपस्थित नसल्याने आमदार यांनी संबंधीत अधिकार्यांना जाब विचारत नैसर्गिक आपत्ती नुकसान पंचनामा प्रसंगी गैरहजर राहणार्या कर्मचार्यावर थेट कारवाईची मागणी केली.
मंडलाधिकारी व तलाठी या दोन महिला कर्मचारी रजेवर असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीचे आसमानी संकट कोसळले असताना रजा कशी काय दिली? असा सवाल ही उपस्थित होत आहे.
येथील ग्रामसेवक अरुण मोरे यांना भ्रमणध्वनीवरुन आमदार यांनी संपर्क साधल्यानंतर चक्क मोबाईल बंद असल्याचे सागण्यात आल्याने त्यांनी थेट गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्याशी संपर्क साधून अशा कर्तव्यात कसूर करणार्या बेजबाबदार ग्रामसेवकाला तात्काळ निलंबीत करण्याचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविण्याच्या सक्त सुचना केल्या.
त्या प्रमाणे दि.27 मे रोजी गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी ग्रामसेवक अरुण मोरे यांना सजेमध्ये विनापरवाना गैरहजर असलेबाबत खुलासा नोटीस काढली आहे.
आमदार व तहसिलदार यांचा दि.27 रोजी पाठखळ गावभेट दौरा आयोजित केला असताना सदर ठिकाणी पंचनामे करणेकामी आपण गैरहजर असल्याचे दिसून आले.
अवकाळी पावसाने व वादळाने नुकसानीचे झालेले पंचनामे करणे क्रमप्राप्त असताना गैरहजर राहिल्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल नियम 1967) च्या तरतुदीनुसार प्रशासकीय कारवाई का प्रस्तावित करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा तात्काळ सादर करावा.
अन्यथा सादर न केलेस पुढील योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे दिलेल्या नोटीसमध्ये गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी नमूद केले आहे. दरम्यान हे ग्रामसेवक अधिकार्यांनाही जुमानत नसल्याच्या तक्रारीचा सुर नोटीस निघाल्यानंतर पंचायत समिती आवारात उपस्थित नागरिक व कर्मचार्यांमधून ऐकावयास मिळत होता.
यापुर्वीही त्यांच्यावर कारवाई होवूनही त्यांच्यात कुठलीच सुधारणा झाली नसल्याची चर्चाही होत आहे. आमदार आवताडे यांनी कारवाईची केलेली मागणी योग्य असल्याचाही सुर सुज्ञ नागरिकांमधून पुढे येत आहे.
सदर ग्रामसेवकावर कारवाई करुन कर्तव्यदक्ष ग्रामसेवक नेमून नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांना व नागरिकांना शासनाची मदत मिळवून द्यावी अशी मागणी पाठखळ परिसरातून पुढे येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज