टीम मंगळवेढा टाईम्स ।
देशाचे नेते खा.शरद पवार यांना दैवत माणून आयुष्यभर पुरोगामी विचारांची पाठराखण करणाऱ्या आ.स्व.भारत भालके निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भालके कुटुंबियातील नावालाच पक्षाची पसंती मिळेल हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही असे परखड मत मरवडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय पवार यांनी केले.
स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी सरकोली येथे वेगवेगळ्या टप्प्यावर भेटी देऊन भालके कुटुंबियांना या दुखाःतून सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
या कुटुंबावर संपूर्ण मतदारसंघातील जनतेच्या असलेल्या अलोट प्रेमाची अनुभूती घेत भारतनाना यांच्या वारसदारांना उघड्यावर पडू देणार नाही, मतदारसंघातील रखडलेले प्रश्न त्यांच्याच माध्यमातून मार्गी लावून स्व.भारतनाना भालके यांची स्वप्नपूर्ती करु असा निर्वाळा दिला आहे.
त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी देखील भालके कुटुंबियाशिवाय अन्य कुठल्याही पर्यायावर पक्षात पुसटशी देखील चर्चा नसल्याचे वारंवार स्पष्ट केले असून पक्ष निरीक्षकांच्या साक्षीने झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीतही एकमात्र भगिरथ भालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सर्वश्रुत आहे.
मात्र एकाच वेळी तीन दगडावर पाय ठेवून राजकारण करणारे पक्षाच्या जबाबदार पदावर काम करणारे ठराविक लोक नसते उद्योग वाढवून ठेवत असल्याने सोशल मिडीयातून उलटसुलट बातम्या येतात त्यालाही तेच जबाबदार आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.
मतदारसंघातील जनतेचे प्रेम स्व.भारतनाना यांच्यावर आणि नानांचे प्रेम पवार साहेबांवर हे अनेकदा अधोरेखित झाले आहे.
मात्र नानांच्या निधनानंतर स्वतःचे राजकीय मार्केटींग करण्याचा आटापिटा काही मंडळीनी चालविला असून प्रत्येक ठिकाणी लुडबुड सुरु असून या खाबुगिरीला पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व भालकेप्रेमी हितचिंतक कंटाळले असून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सुगी समजून प्रसिद्धी मिळविण्यासाठी नसते उद्योग करु नयेत असे आवाहनही शेवटी पवार यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज