टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर पोलिस अधीक्षकपदी शिरीषकुमार सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज शनिवारी नूतन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे पदभार स्वीकारणार आहेत.
पोलिस अकादमी, नाशिक येथे अधीक्षक म्हणून सरदेशपांडे कार्यरत होते. तत्पूर्वी, कोरोना काळात दि.९ ऑक्टोबर २०२० रोजी तेजस्वी सातपुते यांची साताऱ्याहून सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक झाली होती.
दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची बदली झाली असून, राज्यातील एकूण २४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले.
दरम्यान, सरदेशपांडे हे पोलिस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे मानकरी आहेत. २२ वर्षांपूर्वी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत.
चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव येथे पोलिस उपअधीक्षक आणि त्यानंतर लातूरचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून, नांदेड, पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली.
मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी,
नाशिकचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.
बदली झालेल्यांसाठी पुढील आठवड्यात आदेश
राज्यातील एकूण २४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी निघाले. बदली झालेल्यांपैकी १९ अधिकाऱ्यांची नेमणूक कुठे, हे अजून अस्पष्ट आहे. त्यांच्या संदर्भात पुढील आठवड्यात स्वतंत्र निर्णय होईल.
आता ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा अनोखा उपक्रम राबवून वर्षानुवर्षे हातभट्टी दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांना तेजस्वी सातपुते यांनी चांगला समाजमान्य मार्ग दाखविला.
हातभट्टी गाळणारे गाव अशी ओळख असलेल्या मुळेगाव तांड्यात त्यांनी परिवर्तनाचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांची बदली कुठे होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज