टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या ५९ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे अन्यथा आम्हाला इच्छामरनाला परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक मनोज मुदलियार यांनी दिली.
संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करता राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
तरीदेखील शासन कामगारांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे, असा आरोपही संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
शासनाचे एसटी कर्मचाऱ्यांच्या संबंधीचे धोरण असेच राहिल्यास येणाऱ्या काळात आम्हाला आमचे आंदोलन अधिक उग्र करावे लागेल , असा इशाराही कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे सर्वात मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या ५९ दिवसात एसटीच्या संपावर तोडगा काढण्यामध्ये शासन अपयशी ठरले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये फक्त ४१ टक्के पगार वाढ देण्याची घोषणा करण्यात आली पण ४१ टक्के पगारवाढ ही कामगारांनी धुडकावली आहे.
जोपर्यंत एसटीचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतल्यामुळे हा संप गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज