टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकांना मंगळवेढा तालुक्यातील मोहिते समर्थकांसह उमेदवार समाधान अवताडे हेही उपस्थित होते.
ही निवडणूक पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे मोहिते कुटुंबातील अनेकजण या मतदारसंघात ठाण मांडून राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार रणजितसिंह मोहिते, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते यांच्यासमवेत मंगळवेढा तालुक्यातील मोहिते समर्थकांची स्वतंत्र बैठक झाली.
या बैठकीला भारत पाटील, सूर्यकांत ठेंगील, राजाराम जगताप, विजय बुरकुल, बाबा कोंडुभैरी, जयंत साळे, मुजफ्फर काझी, नाथा काशिद, विजय माने, दामाजी साखर कारखान्याचे संचालक काटकरे आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर उमेदवार समाधान आवताडे शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर माळशिरस तालुक्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व मंगळवेढा तालुक्यातील मोहिते समर्थक यांची सभावजा संयुक्त बैठक झाली.
आमदार रणजितसिंह मोहिते म्हणाले, मंगळवेढा-पंढरपूरच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली गेली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला या मतदारसंघात १५ दिवस मुक्कामी राहण्याचे आदेश दिले आहेत.त्यांच्या आदेशानुसार मी येथे मुक्कामी राहून प्रचाराचे नियोजन करणार आहे.
माझ्यासोबत आमच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते , अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते आदींवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातून भाजपचे अनेक कार्यकर्ते मुक्कामी राहून व दररोज ये-जा करून निवडणुकीत काम करणार असल्याचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते यांनी सांगितले.
मोहिते,परिचारकांच्या सांगण्यावरूनच माझी उमेदवारी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपासून आमदार रणजितसिंह मोहिते , आमदार प्रशांत परिचारक आणि आमच्यात मनोमिलन झाले आहे.
या दोन्ही आमदारांच्या सांगण्यावरूनच पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली आहे असे समाधान आवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची खिल्ली उडवत आवताडे यांनी मी लहानपणापासून हे ऐकत आलो असल्याचे म्हटले.
आमदार संजय शिंदे माझे मित्र असले तरी मैत्री व राजकारण आपापल्या ठिकाणी वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज