टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या 14 जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी संपावर जाईल, असा इशारा किसान क्रांती चळवळीचे समन्वयक धनंजय जाधव यांनी दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी किसान क्रांती चळवळीने संप पुकारून तत्कालीन भाजपच्या सरकारला वाकवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या होत्या; पण त्या मागण्या आश्वासनापुरत्याच राहिल्या असून अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
याबाबत आता जनजागृती करण्यासाठी क्रांतीचे समन्वयक धनंजय जाधव हे शेतकरी जागृती मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताहेत. आज ते करमाळा येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
या वेळी धनंजय जाधव म्हणाले, की जनतेला स्वस्त अन्नधान्य व भाजीपाला मिळावा असे सरकारला वाटते; मात्र दुसऱ्या बाजूला शेतकरी भरडला जात आहे. महागाई कमी करण्याच्या नादात शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले जात असतील तर आता शेतकरी गप्प बसणार नाही.
भाजपच्या काळात कर्जमाफी योजनेतील अजून 40 टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. विद्यमान सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली पण ती पन्नास टक्के शेतकऱ्यांना दिली व दोन लाखांच्या पुढील शेतकरी थकीत आहेत. त्यांचा विचार पुढे करू, असे आश्वासन दिले पण अद्याप मोठ्या कर्जदाराला न्याय दिला नाही.
दूध, वीज, हमीभाव या सर्व बाबी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. नवीन आलेला कृषी कायदा तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. या सर्व निर्णयांमुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त होत आहे याची सविस्तर माहिती आम्ही शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन देत आहोत.
शेवटी 14 जानेवारी रोजी आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. त्यासाठी आता शासनाने संक्रांतीपूर्वी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत; अन्यथा येणारी संक्रांत शासनावर कोसळून सरकार पडेल, असा इशाराही धनंजय जाधव यांनी दिला.
हरित क्रांतीमुळे अन्नधान्य क्षेत्रात संपूर्ण देश स्वावलंबी झाला, मात्र अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला. फक्त उत्पादनवाढ करणे यासाठी कृषी खाते काम करते,
पण शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर मिळण्यासाठी कृषी खाते कुठलेच काम करत नाही, याचे गमक आता शेतकऱ्यांच्या पोराला कळालं असून, आम्ही जर उत्पादनच केलं नाही तर तुम्ही खाणार काय?
शेतकरी आत्महत्या मराठवाडा, विदर्भात होत होत्या, भावी काळात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आत्महत्या होतील. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.
आमच्या चळवळीला कोणी नेता नसून, सर्व शेतकऱ्यांची पोरं या आंदोलनात उतरणार आहोत. ठोस निर्णय झाल्याशिवाय आता शेतकरी माघार घेणार नाही, असे शेवटी धनंजय जाधव यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज