टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर शहरात घर नसलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधली जात आहेत. या कामास नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थिगिती दिली आहे.
ती त्वरित उठवावी या मागणीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा साधना भोसले व पक्षनेते अनिल अभंगराव यांनी दिली.
योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सर्वेक्षण करून पालिकेच्या मालकीच्या जागेवर भागीदारी तत्त्वावर 2092 घरकुले बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला.
त्यास शासनाच्या आवश्यक मंजुरी घेऊन प्रकल्पाची महारेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली. या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील 892 घरकुले बांधणीचे काम 60 टक्के पूर्ण झाले. या कामाचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण आयआयटी, पवईसारख्या तांत्रिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेकडून करण्यात येत आहे.लाभार्थींना घरकुल वाटप करण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
ऑनलाइन पद्धतीने बुकिंग फॉर्म व बुकिंग रक्कम नगरपालिकेने स्वीकारले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थींची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतून ऑनलाइन लॉटरी पद्धतीने सोडत करून घरकुलांचे वाटप 26 जानेवारी रोजी करण्यात येणार होते.
परंतु काही राजकीय संघटनांनी प्रकल्पाची माहिती न घेता शासनाकडे खोटी तक्रार केली. त्याची कोणतीही चौकशी न करता नगरविकास राज्यमंत्री यांनी एकतर्फी कामास स्थगिती दिली आहे. स्थगितीमुळे गोरगरीब लोक हक्काचे घरकुल मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
यापूर्वी आमदार प्रशांत परिचारक यांनी लेखी पत्र पाठवून स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आता 25 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती न उठवल्यास शुक्रवारी (ता. 26) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना निवेदने पाठवण्यात आली आहेत.
या निवेदनांवर नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, पक्षनेते अनिल अभंगराव आणि सत्ताधारी आघाडीचे गटनेते ऍड. संग्राम अभ्यंकर यांच्यासह सत्ताधारी आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज