टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथे एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला. नंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचे समोर आले. मात्र या विवाहितेने प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला.
अगदी हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. यामध्ये जाळलेली महिला कोण याचा पोलिस शोध घेत असून विवाहिता आणि तिचा प्रियकर अटकेत आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, PSI विजय पिसे आदी सर्व पोलीस हवालदार कर्मचारी यांनी धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.
एखाद्या हिंदी सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्टपूर्ण घटना मंगळवेढ्यात घडली. मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला. घरासमोरील गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे घरातील विवाहित सूनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले.
मुलीच्या कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
या मुलीचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले. आपल्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे केला. पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय येऊ लागला. त्यातच या विवाहितेचा फोन तिच्या अंगावर जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला.
प्रियकराने खरे सांगितले
या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला. पोलिसांनी लगेच या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला या प्रियकराने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्याने पुन्हा घटनेची खरी कबुली दिली. ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे अशी माहिती त्याने दिल्यानंतर पोलिसही बुचकळ्यात पडले.
व्हिडीओ कॉलवर विवाहिता बोलू लागली
यानंतर प्रियकरास त्या विवाहितेला व्हिडीओ कॉल करण्यास सांगण्यात आले. तर दुसऱ्या बाजूने ती विवाहिताच बोलू लागली आणि पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी तातडीने हा प्रियकर आणि कराड येथे गेलेली ती विवाहिता यांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण खुनाचा उलगडा झाला.
नेमकं काय घडलं?
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण या 23 वर्षीय विवाहितेने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याच चित्र निर्माण करण्यात आलं. या घटनेनंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगाने रडत होता. त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले.
किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. किरणच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला.
याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. यातील विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर 20 वर्षीय निशांत सावंत यांचे काही महिन्यापासून अफेअर सुरू होते. विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे. आपण दोघे कायमचे पळून जायचे असे या दोघांनी ठरवले आणि त्यातूनच ही भयानक खुनाची स्टोरी रचली गेली.
यामध्ये किरण हिने आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा, यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे असे ठरले. मात्र यासाठी कोणाचातरी मृतदेह यात असणे आवश्यक असल्याने किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला. आठ दिवसांच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले.
यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटनेदिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला.
रात्री अडीच वाजण्याच्या सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावले आणि डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले . यात निशांत ही सामील होता. या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले.
मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला. सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचे दिसले. नंतर मोबाईल सीडीआर वरून निशांत पर्यंत पोलिस पोचले आणि निशांतने किरणच्या मदतीने केलेल्या या सस्पेन्स खून प्रकरणाचा उलगडा केला.
सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र स्वतःचे विवाहबाह्य संबंध झाकून कायमचे मजेत जीवन जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करणाऱ्या या जोडीला पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवत या प्रकरणाचा उलगडा केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज