टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे.
सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असं सांगतानाच आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली.
पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा नरेंद्र पाटलांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. एवढंच नाही तर केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
संचारबंदीचा आदेश झुगारून लावत हजारो मराठा तरूण-तरूणी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा आणि कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणाही देण्यात आल्या.
या मोर्चात हजारो तरूणांनी सहभाग घेतल्याने पोलीस यंत्रणेलाही त्यांना नियंत्रणात आणण्यात कसरत करावी लागली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने आंदोलक संतापले होते.
मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. संचारबंदी लागू आहे तसंच कोरोना प्रादुर्भावाचाही धोका आहे असंही पोलिसांनी म्हटलं होतं.
मात्र संचारबंदीचे आदेश न मानता मोर्चा काढण्यात आला. सोलापूर येथील संभाजी चौक भागात सकाळीच आंदोलक जमले. दुपारनंतर ही गर्दी वाढली आणि घोषणांनीही परिसर दणाणून गेला. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून काही जणांची धरपकड केली. ज्यानंतर नरेंद्र पाटीलही संतापले होते.
माढाचे माजी खासदार रणजित नाईक-निंबाळकर मोर्चासाठी उपस्थित होते. जोपर्यंत ग्रामीण भागातील लोक मोर्चाच्या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत मोर्चा काढणार नाही, असा इशारा नाईक-निंबाळकर यांनी दिला. त्यामुळे संभाजी चौकात एकच गर्दी झाली होती.
या मोर्चाला आठ आमदार आणि दोन खासदार उपस्थित होते. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मोर्चात भाग घेतला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मोर्चा काढला जात आहे. त्यामुळे सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती. पण महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले. राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली.
ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप करतानाच ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज