मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील भोसे आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी दाखल महिलेचे बाळंतपण सुखरूप झाले.त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने उपचारासाठी मंगळवेढ्याकडे नेत असताना तिचा मृत्यू झाला.अश्विनी दत्तात्रय केंगार (वय २२, होसपेट,ता.जत,जि.सांगली) असे या महिलेचे नाव आहे. हे तिचे दुसरे बाळंतपण होते.अश्विनी केंगार यांना सकाळी नऊ वाजता तिच्या माहेरच्या हुन्नूर येथील नातेवाइकांनी बाळंतपणासाठी भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.
सकाळी १० वाजून १० मिनिटांनी अश्विनीचे बाळंतपण यशस्वीरीत्या होऊन कन्यारत्न प्राप्त झाले.बाळंतपण झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत संबंधित महिलेवर कसलेच उपचार न झाल्याने दुपारी पावणे एकच्या दरम्यान अश्विनीला जोराची चक्कर आली.अश्विनीसोबत असलेल्या महिलेने संबंधित महिला कर्मचाऱ्यास माहिती दिल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने बाळंतपण कक्षात जाऊन पाहिले.अश्विनी यांचा भरपूर रक्तस्राव झाल्याचे लक्षात आल्यानंतर व कसल्याही उपचारास अश्विनी प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकारी आर.डी
.काटे यांना बोलावून घेतले.
त्यानंतर अश्विनीला सलाइन लावण्याचा प्रयत्न केला,परंतु सलाइन लागत नव्हते.त्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकारी आर.डी.काटे यांनी रुग्णास मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.त्यानंतर अश्विनीस मंगळवेढ्याकडे नेत असताना दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी रुग्णवाहिकेत खडकीजवळ दुर्दैवी मृत्यू झाला.
भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेली घटना दुर्दैवी आहे.या घटनेत ज्या कोणी कर्मचाऱ्याने दुर्लक्ष केले आहे.त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.- दिलीप चव्हाण,उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती.
जिल्हा परिषद सोलापूर मी सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो.नेहमीप्रमाणे बाह्यरुग्ण विभागात भरपूर रुग्ण असल्याने दुपारी साडेबारापर्यंत मी बाह्यरुग्ण विभाग सांभाळत होतो.मला याबाबत संबंधित महिला कर्मचाऱ्याने दुपारी एकच्या सुमारास माहिती दिली.मी लगेच तपासणी करून संबंधित महिलेला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयकडे पाठवले.- आर.डी.काटे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,भोसे
संबंधित महिलेच्या अंगात रक्त कमी असल्याने बाळंतपणात गुंतागुंत होऊ नये,यासाठी सकाळीच मी मंगळवेढा येथे जाण्याचा सल्ला दिला होता. परिस्थिती गरीब असल्याने आम्ही पुढे जाऊ शकत नाही,असे नातेवाइकांनी सांगितले.त्यानंतर महिलेस बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले.- सखुबाई घाडगे, आरोग्य सहायिका,प्राथमिक आरोग्य केंद्र,भोसे
जाहिरात –
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज