टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील हातावरील शिल्लक रक्कम व इतर दोन बँकांच्या खात्यामधील रक्कम असा एकूण 5 कोटी 57 लाख दोन हजार 822 रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू (वय 49, रा. मूळ मंगळवेढा, हल्ली रा. कडलास रस्ता, सांगोला) याला पोलीस उपअधीक्षक एस. जी. बोटे यांनी बुधवारी अटक केली. माढा न्यायालयाने राजगुरू याला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रतनचंद शहा बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर (वय 67, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी टेंभुर्णी शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू व तत्कालीन कॅशियर अशोक भास्कर माळी या दोघांनी संगनमताने 5 कोटी 57 लाख दोन हजार 822 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रतनचंद शहा बँकेत हरिदास निवृत्ती राजगुरू हे 11 नोव्हेंबर 2014 पासून शाखाधिकारी, तर कॅशियर म्हणून अशोक भास्कर माळी हे कार्यरत होते. बँकेने धनराज नोगजा ऍण्ड असोसिएट्स सोलापूर यांच्याकडे लेखापरीक्षणाचे काम दिले होते.
त्यांनी केलेल्या लेखा परीक्षणामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये विसंगती झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत लेखापरीक्षण अहवाल बँकेकडे सादर केला. बँकेच्या संचालक मंडळाने लेखापरीक्षण अहवालाबाबत दयासागर सिद्धेश्वर देशमाने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
चौकशीमध्ये बँकेच्या टेंभुर्णी शाखेमध्ये हातावरील शिल्लक रकमेत 1 कोटी 14 लाख 87 हजार 822 रुपये, तसेच सन 2016 ते सन 2020 या कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया शाखा टेंभुर्णी या खात्यामध्ये 1 कोटी 92 लाख 25 हजार रुपये,
तर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा टेंभुर्णी येथील खात्यामध्ये 2 कोटी 49 लाख 90 हजार रुपये अशी एकूण 5 कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांची तफावत आढळून आली.
बँकेचे टेंभुर्णी शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी हरिदास राजगुरू व तत्कालीन कॅशियर अशोक माळी यांनी संगनमताने रकमेचा अपहार केल्याची फिर्याद सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी दिली आहे.
फिर्यादीनंतर तत्कालीन शाखाधिकारी हरिदास राजगुरू हे फरारी होते. पोलीस उपअधीक्षक एस. जी. बोटे यांनी बुधवारी हरिदास राजगुरू याला अटक केली. आज त्याला माढा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज