मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । तालुक्यातील मरवडे येथील एका शिक्षकाचा बंगला फोडून सोन्याचे दागिने, मोबाईल, घडयाळ असा ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेवून गेली आठ महिने फरार असलेला आरोपी राहूल रमेश काळे (वय.२४ वर्षे), विनोद सुरेश पवार (वय.२२) दोघे रा.नंदर ,या दोघांना पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.
दरम्यान दोघा आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायाधीश जी.एम.चरणकर यांच्यासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी उत्तम जाधव हे शिक्षक असून दि.२७ जून रोजी ते आपल्या कुटुंबासमवेत जेवणखाण करून रात्री १० वा. घराच्या खोल्यांना आतून कडी कोयंडा लावून गच्चीवर कुटुंबासमवेत झोपले होते.दि. २८ जून रोजी शाळेत कार्यक्रम असल्याने पहाटे ५ वा फिर्यादी उठले असता त्यांच्या उशाजवळ ठेवलेला मोबाईल मिळून आला नसल्याने त्यांनी शोध घेत गच्चीवरून खाली घरात आले असता दरवाजाची कडी काढलेली दिसली.
फिर्यादीने दरवाजा उघडण्यचा प्रयत्न केला असता आतून कडी लावल्याने निदर्शनास आले.कडी काढून आत पहिले असता कपाट तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने, घडयाळ, हँडसेट ,असा ७१ हजार रुपये किमतीचा मुद्दमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
या घटनेनंतर चोरीस गेलेला मोबाईल वरील दोघा आरोपीनी एका व्यक्तीस विकला होता. त्या व्यक्तीकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राहूल काळे व त्याचा साथीदार विनोद पवार यांनी विकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.घटना घडल्यापासून पोलिस त्या दोघांच्या मागावर होते. दि.२६ रोजी वरील दोन्ही आरोपी नंदूर गावात आल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी. दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यासह १५ पोलिसांचे पथक नंदूर गावी दाखल झाले.
पोलिसांना पाहताच आरोपी शिवारात पळू लागले. मात्र १५ पोलिसांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही अखेर ते दोघे आठ महिन्याच्या कालाधीनंतर पोलिसांच्या जाळयात सापडले.
दरम्यान पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायाधीश जी.एम. चरणकर यांचेसमोर उभे केले. यावेळी इतर साथीदारांचा शोध घेणे , चोरीतला मुद्देमाल जप्त करणे आदी मुद्दे मांडले असता ५ दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज