टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोयना प्रकल्पग्रस्त असल्याचा डमी दाखला मिळवून मंगळवेढा तालुक्यात जमिनी व प्लॉट लाटल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पहिल्या यादीतील 573 लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
त्यापैकी केवळ 36 लोकांनीच त्याचा खुलासा पाठविल्याने उर्वरीत 537 लोकांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाल्याने उजनीच्या जमिनी व प्लॉट घेणार्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दुसर्या यादीतील लोकांनाही लवकरच नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
सातारा जिल्हयात कोयना प्रकल्पाला ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मंगळवेढा तालुक्यात प्रकल्पग्रस्त म्हणून जमिनी व प्लॉट मिळाल्या होत्या.
यामध्ये काहींनी जमिनी गेल्या नसतानाही डमी दाखला मिळवून जमिनी व प्लॉटचा लाभ मिळविला.यामध्ये दलालांनी सोलापूर येथील वरिष्ठांना हाताशी धरून त्या प्लॉट व जमिनीची मोठया प्रमाणात विक्री करून आपले हात पांढरे करून घेतल्याचा प्रकार घडला असून ज्यांनी या जमिनी खरेदी केल्या.
त्यांना मात्र आता पश्चातापाची वेळ आली आहे.बोगस दाखले मिळवून जमिनी लाटल्याचे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचल्याने याच्या चौकशीचा फेरा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु झाल्याने तालुक्यातील 573 लोकांना नोटीसा बजाण्यात आल्या होत्या.
15 दिवसात प्रकल्पग्रस्त खातेदार असल्याच्या पुराव्यासह कागदपत्रे सादर करावीत अन्यथा प्लॉट व जमिनी शासकीय जमा केल्या जातील असे नोटीसमध्ये नमूद केले होते.
याची मुदत दि.30 डिसेंबर रोजी संपली असून केवळ 36 लोकांनीच याबाबत खुलासे दिले असल्याचे महसूलकडून सांगण्यात आले. 537 लोकांनी अदयापही खुलासे न दिल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
खुलासे प्राप्त झालेली गावे व संख्या पुढील प्रमाणे
मंगळवेढा-4, डोणज-1, माचणूर-4, मारापूर-1, देगाव-1, मल्लेवाडी -2, उचेठाण -1, घरनिकी -2, तांडोर-6, बोराळे-14 असे 36 जणांचे खुलासे प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकंदरीत दोन यादया कारवाईसाठी प्राप्त झाल्या असून हा कारवाईचा पहिला टप्पा होता. उर्वरीत दुसर्या टप्प्यामध्ये राहिलेल्या लोकांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज