मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण करण्यात आले आहेत. तालुक्यातील ८१ गावातील ४० हजार ८१९ बाधित शेतकऱ्यांच्या ३१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यासाठी ३४ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी बोलताना दिली.
मंगळवेढा तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून संतताधर पाऊस सुरु होता. ऑक्टोबर महिन्यात सलग दहा दिवस दुष्काळी पट्ट्यातील गावासह अन्य भागात अतिवृष्टी झाली.
भीमा व माण नदीकाठी महापुराने हाहाकार माजविला.त्यामुळे सर्वच नद्या, ओढे तुडुंब भरून वाहत होते. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिके पाण्यात बुडाली. आजही शेतात पाणी आहे.तर नुकतीच पेरणी केलेली रब्बी पिकानाही मोठा फटका बसला, ज्वारी, बाजरी, कडधान्य, भुईमूग, पिके शेतातच कुजली आहेत. उसासह फळपिकांनाही मोठा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळाले नाही.दरम्यान तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक व कृषिसहायक असे १०१ कर्मचाऱ्याच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते, मंत्री, खासदार आणि आमदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे का होईना, पंचनाम्याचे गांभीर्य वाढले आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले. सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणवर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आला असून, त्यानुसार ४० हजार ८१९ बाधित शेतकऱ्यांच्य ३१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्राला अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे. तर नुकसान ३४ कोटी ७६ लाख रुपयांचे झाले आहे . यामध्ये २० हजार ४८४ हेक्टर हे कोरडवाहू असुन १५ हजार ४५५ बाधित शेतकऱ्यांचे १० कोटी ५१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर १० हजार २८३ हेक्टर बागायत पिकाखालील नुकसान क्षेत्र असून बाधित शेतकऱ्यांची संख्या १२ हजार ५८४ इतकी आहे त्याचे नुकसान १३ कोटी ८८ लाख रुपये , तर ५ हजार ७६३ हेक्टर फळपिकांचे १० कोटी ३७ लाखाचे नुकसान झाले असून ७ हजार ७५१ बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे अशी माहिती महसूल विभागाचे महावीर माळी यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, घोषणेनुसार कोरडवाहू व बागायत क्षेत्रासाठी सरसकट १० हजार रुपये हेक्टर (२ हेक्टर मर्यादा) तर फळपिकांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी (२ हेक्टर मर्यादा) मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळीपूर्वीच ही मदत देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांतच शेतकऱ्यांना अनुदान वाटपास सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या निकषानुसार अनुदान वाटप न करता सरसकट १० हजार प्रतिहेक्टर व फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरचा निर्णय घेण्यात आल्यामुळे याचा फायदा दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.
अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण करण्यात आले आहेत. तालुक्यातील ४० हजार ८१९ बाधित शेतकऱ्यांच्या ३१ हजार ५०३ हेक्टरवरील पिकाची हानी झाली आहे ३४ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
-स्वप्निल रावडे, तहसीलदार, मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज