टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात डेंग्यू सदृश्य, ताप, सर्दी, खोकला व चिकणगुण्या आदींचे रुग्ण वाढत असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आरोग्य विभागाकडे कर्मचार्यांची विविध पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाच सलाईनवर असल्याच्या प्रतिक्रीया सध्या व्यक्त होत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे मानवी शरिरावर परिणाम होवून बालके, वृध्द व तरुणवर्ग सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यू सदृश्य आजाराला बळी पडले आहेत.
दरम्यान महसूल विभागातील एक महसूल अव्वल कारकून हे डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निवडणूकीच्या कामाचा पडणारा ताण व बदलते हवेतील वातावरण यामुळे मतमोजणीच्या दिवशीच त्या कर्मचाऱ्यांच्या अंगातील पेशी कमी झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सध्या त्यांना डॉक्टरच्या नियंत्रणाखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. सोलापूर येथे उपचार घेत आहेत.
ताप, सर्दी, खोकला, चिकनगुण्या आदी साथीने नागरिक हैराण आहेत. यामध्ये लहान बालके अधिक प्रमाणात आहेत. दामाजीनगर ग्रामपंचायतीने परिसरात सर्वत्र धूर फवारणी व पावडर फवारणी करुनही डासांचा उपद्रव कमी होत नसल्याने या आजाराला बळकटी मिळत आहेत.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून विविध कर्मचार्यांची रिक्त पदे असल्यामुळे तुटपुंज्या कर्मचार्यावर आरोग्य विभाग सुरु असल्याचे सांगण्यात आले.
परिणामी, रोगराईचे प्रमाण एकीकडे वाढत असताना आरोग्य विभागाच सलाईनवर असल्याच्या तिखट प्रतिक्रीया नागरिकामधून उमटत आहेत.
मंगळवेढा शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायतीने व नगरपालिकेने तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीने धूर फवारणी व पावडर टाकून घेतल्यास डासांचा उपद्रव कमी होवून या रोगराईला अटकाव करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शासकीय आरोग्य विभागाकडे डेंग्यू सदृश्य व इतर रुग्णाबाबत माहिती विचारल्यास हात झटकले जात असल्यामुळे निश्चित रुग्णांचा आकडा प्रसारमाध्यमांना मिळू शकला नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज