मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आषाढी यात्रा सोहळा दोन दिवसांवर आलेला असतानाही पंढरपूर शहर आणि तालुक्यात अद्याप एकही पाऊस पडला नव्हता. उन्हाचा कडाका आणि उकाड्याने हैराण झालेल्या
पंढरपूरकरांना शनिवारी पहिल्या पावसाने चिंब केले, सुमारे अर्धा ते पाऊण तास हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्याने पंढरपूर शहरातील तापमानाचा पारा खाली आला आहे.
हा पाऊस पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांचा उत्साह वाढविणारा असला तरी पुढील काही दिवस असाच पाऊस पडल्यास आषाढीत वारकरी व्यावसायिकांची तारांबळ उडू शकते.
आषाढी यात्रा सोहळा चार दिवसांवर आला आहे. मात्र यावर्षी हंगामात २४ जून उजाडला तरीही शहर आणि तालुक्यात पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. ग्रामीण भागातील ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत.
पाऊस तर नाहीच, परंतु उन्हाचा पारा आणि उकाडा अजिबात कमी झाला नव्हता. जूनच्या तिसन्या आठवड्यात साधे पावसाचे वातावरणही तयार झाले नव्हते. त्यामुळे दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती.
आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर आलेले असतानाच जणू वारकरी आल्याचा सांगावा घेऊन शनिवारी पंढरपूर शहरात पावसाच्या हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
यामुळे तापमान कमी होऊन शहरात वातावरण आल्हाददायी झाले आहे. वारकऱ्यांसह स्थनिक नागरिकही पहिल्या पाऊसधारांनी सुखावले आहेत. लहान मुले, युवकांनी पावसात भिजण्याचा आनंदही घेतला.
पुढील चार दिवस पाऊस कमी- अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय, व्यापाऱ्यांवर परिणाम होणार असला तरीही पंढरपूरकर मात्र पावसाचे उत्साहात स्वागत करीत आहेत असे दिसते.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज