टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज आमच्यासमोर संघर्ष करणे किंवा शरण जाणे हे दोनच मार्ग आहेत. शरण जाण्याऐवजी संघर्ष करेन, याहून कठीण परिस्थिती मी गेलेलो आहे. यातूनही बाहेर पडू.
चालू कारखाना बंद पाडून कोणतंही सरकार कारवाई करणार नाही, कारखाना बंद पडावा या राजकीय हेतूने हा प्रकार होत असल्याचा आरोप श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केला आहे.
श्री विठ्ठल कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्या संदर्भात पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
यावेळी कार्यकारी संचालक दत्तात्रय गायकवाड, संचालक जनक भोसले, सचिन पाटील, सचिन नागटिळक आदी उपस्थित होते.
अभिजित पाटील म्हणाले की, राज्य सहकारी बँकेचे जे थकीत कर्ज आहे, ते सर्व २०२१ पूर्वीचे आहे. आमच्या संचालक मंडळाने एक रुपया ही नवीन कर्ज काढलेले नाही. संचालकांचे नावावर कर्ज काढून कारखाना चालवतो आहोत.
यापूर्वीची शेतकऱ्यांची थकीत ३० कोटी रुपये रक्कम दिलेली आहे. शिवाय साखर विक्रीतून आलेले ३० कोटी रुपये बँकेकडे भरलेले आहेत. उर्वरित कर्जापोटी बँकेसोबत आमची बोलणी सुरू आहेत,
असे असताना आम्हाला या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ज्यांच्या लेखी पत्रावरून ही कारवाई होत आहे, ते पत्र संतोष सुळे यांनी दिलेले आहे.
ते सुळे कारखान्याचे सभासद ही नाहीत. त्यामुळे हा पत्रव्यवहार भगीरथ भालके यांच्या आदेशानुसार झाला असावा, अशी शंका पाटील यांनी बोलून दाखवली.
भारत नानांचे स्वप्न पूर्ण केले
दोन वर्षे बंद राहिलेला साखर कारखाना आम्ही सुरू केला. २०२० सालची थकबाकी देऊन आम्ही मागील हंगामात २ हजार ५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना सगळे पैसे दिले. या हंगामात कारखान्याने आज अखेर ५ लाख ७० हजार टनाचे गाळप केलेले असून जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा लावली आहे. त्यामुळे कारखाना बंद पाडण्यासाठी अशा प्रकारे पत्रव्यवहार केला असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज