टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील तरूण डोळे लाऊन असणार्या पोलीस भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून याच्या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये तब्बल १२ हजार ५३८ कर्मचार्यांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
पोलीस खात्यात मोठी भरती होणार असल्याचे सूतोवाच आधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलतांना देशमुख यांनी याबाबत घोषणा केली.
ते म्हणाले की, पोलीस खात्यात 12 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार 300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
तसेच 12 हजार 538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.
याआधी अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरातही अश्वदल पोलीस युनिट सुरु केले जाणार असल्याचे म्हटले होते. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज