टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील (स्व.) आमदार भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून मतदारसंघातील प्रत्येक गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांनी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
या यात्रेचा प्रारंभ सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी दुपारी 4 वाजता मंगळवेढा येथील आठवडा बाजार चौकातून होणार आहे.
राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आजपासून ही यात्रा सुरू होणार आहे.भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघातील अनेक गोरगरिब माता-भगिनी, नागरिक, तसेच शेतकरी बांधवांनी भेटून आधार दिला.
त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा काढण्यात येत असल्याचे भालके गटाकडून सांगण्यात येत आहे.असे असले तरी थेट जनतेशी संपर्क साधण्याच्या या दौऱ्यामुळे भालके गटाने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.तीन वेगवेगळ्या पक्षातून आमदार झालेले भारत भालके हे नेहमी पक्षांपेक्षा व्यक्तिगत राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत.
जनता हाच माझा पक्ष ही भूमिका ठेवून अकरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी जबाबदार अधिकाऱ्याला मोबाईलवरून फोन करत तो प्रश्न सोडवून घेत असत. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड बोलणे, यामुळे अधिकारीवर्गातही आमदार भालके यांच्याविषयी आदरयुक्त भीती निर्माण झाली होती.
त्यांच्या अकाली निधनामुळे मतदार संघाचे रखडलेले प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही सांत्वनपर भेटीच्यादरम्यान आमदार भालके यांनी हाती घेतलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली होती.
आमदारकीच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भालके यांनी मंगळवेढ्यासाठी स्वतंत्र शासकीय निर्णय घेण्यास भाग पाडून मंगळवेढ्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ निधी, चारा छावण्या व पाण्याचे टॅंकर उपलब्ध झाले. मंगळवेढा व सांगोल्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय मंगळवेढ्यात आणले.
दुष्काळी गावात पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ग्रामीण भागात सर्वाधिक निधी मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरण्याचा मान (स्व.) भारतनाना भालके यांना होता.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील अनेक प्रश्नांसाठी विशेषतः दुष्काळी अनुदान, पीक विमा, विजेचे प्रश्न, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, राईनपाडा हत्याकांड याप्रश्नी भालके यांनी विधानसभा दणाणून सोडली.
स्वतःच्या शैक्षणिक अभ्यासापेक्षा पाणी प्रश्नाचा अधिक अभ्यास झाल्याचे ते सांगत.मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी मंत्रालयात असतानाच त्यांच्या बहिणीचे निधन झाले. त्यावेळीही त्यांनी व्यक्तीगत दुःख बाजूला ठेवून उपसा सिंचन योजनेच्या कामाला प्राधान्य दिले.
परंतु भारतनानांच्या अकाली मृत्यूमुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात एक प्रकारची नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे.ती पोकळी भरून काढत जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा (स्व.) आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे असणार आहेत. कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, उत्तम जानकर, प्रकाश पाटील, उमेश पाटील, शिवसेनेचे संभाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, प्रहार संघटनेचे दत्ताभाऊ मस्के, रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) सोमनाथ भोसले आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील प्रत्येक गावांत भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.(सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज