टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून रंगली आहे. यासंदर्भात दिल्लीत गुरुवारी रात्री महायुतीचे प्रमुख नेते आणि अमित शाह यांची बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी त्याची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. या बैठकीपूर्वी अमित शाह शेवटच्या क्षणी महाराष्ट्रातील मराठा समीकरणाचा विचार करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बाजूने कौल देऊ शकतात, अशी चर्चा होती.
मात्र, या बैठकीतील छायाचित्रे बाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या बैठकीतील त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणार होते. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज दिल्लीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता.
या बैठकीवेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचे एक छायाचित्र टिपण्यात आले आहे. या छायाचित्रात अमित शाह हे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे.
याउलट शेजारी उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव कमालीचे विरुद्ध आहेत. एरवी एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठीभेटी घेताना प्रचंड उत्साही असतात. मात्र, या फोटोत एकनाथ शिंदे हे शुन्यात हरवल्यासारखे उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मलूल आणि उदास भाव दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीतील बैठकीतील एकनाथ शिंदे यांच्या या बॉडी लँग्वेजची प्रचंड चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक होते. शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून वातावरणनिर्मिती करुन भाजपवर तसा दबावही टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भाजपश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा संदेश दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली होती.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र, दिल्लीच्या कालच्या बैठकीतील त्यांची बॉडी लँग्वेज वेगळेच काही संकेत देणारी ठरली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज