शैला गोडसे यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल
टीम मंगळवेढा टाईम्स ।
अनेक वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील अनेक पाण्याच्या योजना जाणूनबुजून रखडवल्या. या योजनांचे पाणी इंदापूरला पळविण्यासाठीच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे १ टीएमसी पाणी कमी करण्याचा घाट घातला होता का ? भागातील असा प्रश्न उपस्थित करत झेडपी सदस्या शैला गोडसे यांनी पालकमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
पंढरपूर पोटनिवडणुकीत पाणीप्रश्नावर बोलणारे आजी-माजी आमदार, मंत्री मंगळवेढ्याचे हक्काचे पाणी इंदापूरला जात असताना आता गप्प का? असा सवालही त्यांनी केला.
पुणे येथून येणाऱ्या सांडपाण्याच्या नावाखाली पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून मंगळवेढ्यासह सोलापूर जिल्ह्याचे ५ टीएमसी हक्काचे पाणी इंदापूरला नेण्याचा घाट घातला आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर तसे आदेशही निघत आहेत.
या पाण्यामुळे इंदापूर तालुक्यातील जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव आहे. हीच मागणी आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची असून, मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावची उपसा सिंचन योजना असो किंवा उजनी धरणातून ‘टेल टू हेड’ याअंतर्गत मंगळवेढ्याच्या शेवटच्या टोकाला शेतीसाठी हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे.
या तालुक्यातील अनेक योजना पाणी उपलब्ध असूनही जाणूनबुजून रखडवल्या जात आहेत. या योजनेचे उजनीत पाणी शिल्लक दाखवून ते इतर जिल्ह्यात उचलण्याचा घाटही सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
मात्र हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. यासाठी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात पाणी संघर्ष समितीची स्थापना करून सत्ताधाऱ्यांना इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याचा डाव हाणून पाडणार असल्याचे शैला गोडसे यांनी सांगितले.(लोकमत)
…मग पाणी इतर जिल्ह्यांना का?
भीमा नदीवर इंदापूरला उजनी धरणाची निर्मिती करताना धरणाच्या निर्मितीसाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकांचे झालेले विस्थापन, शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी, पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी केलेली तरतूद आहे.
त्या धर्तीवरच जवळपास ११० टीएमसी पाणी असलेल्या उजनीची निर्मिती झाली. कालांतराने जिल्ह्यातील काही नेत्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांकडून सोलापूरच्या हक्काचे पाणी लातूर, बारामती, इंदापूर, पुणे आदी जिल्ह्यांनी घेतले आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. हा प्रकार आता थांबला पाहिजे, असे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज