टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये काळे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी कल्याणराव काळे यांच्याकडे केली.
येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या सभागृहात काल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली.
सध्या पंढरपूर तालुक्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काळे गटाची काय भूमिका राहणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांनी कारखान्याचे चेअरमन असताना श्री विठ्ठल सहकारीच्या विस्तारीकरण, कारखान्याचे प्रवेशद्वार बांधणे,
कारखाना परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे उभा करणे, परिसरातील व कर्मचारी वसाहतीतील लोकांसाठी कारखाना कार्यस्थळावर हनुमान,
विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम यांचे मंदिर उभारणे याचबरोबर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना उच्चांकी बोनस वाटप करणे, ऊस उत्पादक सभासदांना जिल्ह्रयात सर्वाधिक ऊस दर देणे या सारखे महत्वाचे निर्णय घेतलेले होते.
त्यांच्या पश्चात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनीही संचालक मंडळामध्ये पाच वर्ष काम केले.
तसेच कै.वसंतदादा काळे यांचे चिरंजीव समाधान काळे यांनीही संचालक मंडळामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे कल्याणराव काळे यांना माननारा सभासद वर्ग तालुक्यात मोठया प्रमाणात आहे.
सध्या पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात काळे गटाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत.
मागील दोन वर्षामध्ये साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी असताना कल्याणराव काळे यांनी श्री विठ्ठल परिवाराचा घटक असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु करुन 4.50 लाख मे.टन ऊसाचे गाळप केलेले आहे.
त्यामुळे परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असताना मोठया प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सध्या कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहाकारी साखर कारखान्याबरोबर, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था,
निशिगंधा सहकारी बँक, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ या सारख्या संस्थांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्तेंचे जाळे तालुकाभर पसरले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व तोडणी वाहतुक दारांची ऊस बीले मिळावीत यासाठी कल्याणराव काळे यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज