टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
एकीकडून मराठा समाजाची मते घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात बोलायचं पुन्हा असं केलं तर विधानसभेला सगळा उलटफेर करू, असंही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठा समाजाला आरक्षण दिलं तर विरोध करणार ही भाषा वापरली जाते आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही आता निवडून आलात. विधानसभेला आम्ही सगळे पाडून टाकू, असा इशारा मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला.
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना जरांगे म्हणाले, “ते कशासाठी आले होते, मला माहीत नाही. काँग्रेसने मराठ्यांची मते घेतली, निवडून आले. तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतात. त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.”
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रत्युत्तर दिलं. याला त्याला पाडण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणा. ज्या विचारसणीवर जरांगे पाटील काम करत आहेत.
त्यांच्या विचारसणीची लोक ते विधानसभेत निवडून आणण्यात यशस्वी झाले, तर त्यांच्या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल आणि मराठा समाजाचे प्रश्न निकाली निघेल, असंही ताडवाडे म्हणाले.(स्रोत:साम TV)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज