मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला एक जीआर शासनानं काढल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवरच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना अर्ज करायचा आहे?
मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी? या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली.
गाव पातळीवर गठीत समितीचे सदस्य
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, प्रत्येक गाव पातळीवर विशेष समित्या गठीत केल्या गेल्या आहेत. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी अधिकारी या समितीमध्ये असतील. या समितीच्या अहवालावर आधारित सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र देण्यात येईल.
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? आणि अर्जाची प्रक्रिया कशी असेल?
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज थेट उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे करावा. त्यानंतर अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवली जाईल. या समितीकडून वंशावळ तपासणी केली जाईल. त्याचबरोबर जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील.
चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे.
प्रशिक्षणामध्ये जात प्रमाणपत्राच्या नियमावली, चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया
1) मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज करावा.
२) उपविभागीय अधिकारी या अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवेल
3) ही समिती अर्जदाराची वंशावळ तपासणी करेल
4) यानुसार जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील
5) चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे आवश्यक.
2) वरील पुरावा उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक.
3) अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक.
4) याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज