मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यात कोरोनाव्हायरसचा प्रकोप वाढत असताना सुरू झालेल्या मान्सूनमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढणार आहे. आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि अनेक उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मुंबईत आणि उपनगरांत पावसाचा जोर सुरू आहे. Heavy rains continue in Mumbai
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे सबवेकडे जाणारा मुख्य मार्गदेखील बंद करण्यात आला आहे. साचलेल्या पाण्यामध्ये ऑटोरिक्षा आणि इतर वाहनं अडकून पडले असल्याची माहिती देण्यात येत आहे. सबवेच्या रस्त्यामध्ये जिथे जिथे पाणी साचलं तिथे पोलिसांकडून दोर लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.
मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विशेषतः मेट्रोची काम सुरू असलेल्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतं. चर्चगेट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सायन भागात षणमुखानंद सभागृह रोडवरील मुख्य रस्ता चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील या रस्त्यावर झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला पाऊस आज चांगलीच हजेरी लावणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. मुंबई शहर, मध्यवर्ती भागात (70 मिमी) जोरदार पाऊस पडला असून इतर भागात हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली. पुढच्या 24 तासात कोकण, मुंबई काही भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
मुंबईत सर्वदूर मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज हवामान विभागाने मुंबई ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. दक्षिण मुंबई म्हणजेच कुलाबा ते भायखळा, मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
आयएमडीने मुंबईला व किनारपट्टीवर 24 ते 48 तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 3 जुलै आणि 4 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज