मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार कमबँक केलं आणि चांगलाच जोर धरला. अशातच आता सर्वांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे असणार आहेत.
पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील घाट भागांसाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 12 दिवस हे पावसाचे असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी 18 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने काम असेल तरच घरातून बाहेर पडा, असा सल्ला देण्यात येतोय. सोलापूर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत 19 रोजी रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाळी शक्यता आहे.
राज्यात पाऊस सुरू असताना पुणे आणि परिसरात मात्र हलकासा पाऊस सुरू आहे. मात्र, येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आजपर्यंत 88.44 लाख हेक्टरवर (62 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
तसेच राज्यात पेरणीच्या कामास वेग आला असून कापूस व सोयाबीन पिकाच्या उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत सरासरी 83 टक्के पेरणी झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज