टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूरसह राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ९७ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
तर मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यामुळे राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे.
काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरु आहेत, पण अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणात व निवडणूक ड्युटीमुळे पंचनामे सुरु झालेले नाहीत, अशी स्थिती आहे.
पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली, अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना सर्व पिकांचा पीकविमा मिळालेला नाही. त्यानंतर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि त्या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत देखील मंजूर केली.
मात्र, अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देखील मिळालेली नाही. आता एप्रिलमधील अवकाळीचा फटका राज्यातील २१ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बसला असून त्यात जवळपास ९७ हजार हेक्टरवरील विशेषत: फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यामुळे आंबे गळून पडले आहेत.
आता ज्या भागात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे, त्यांना नियमाप्रमाणे भरपाई मिळेल. पण, त्यासाठी पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला सादर होणे आवश्यक आहे. पंचनाम्यांची गती पाहता मदतीसाठी आणखी काही दिवस बाधित शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल हे निश्चित.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्व नेतेमंडळी प्रचारात मग्न आहेत, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे का नाही असा सवाल देखील यावेळी उपस्थित होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १४०० हेक्टरवरील बागांचे नुकसान
सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील जवळपास ८९ गावांमधील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका सोसावा लागला आहे. त्यात बागायती क्षेत्रावरील ११० हेक्टर तर चौदाशे हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्याची स्थिती आहे. केळी, आंबे, द्राक्ष पिकांना सर्वाधिक फटका बसला असून त्याचे पंचनामे सुरु आहेत.
करमाळा तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस व मोहोळ या पाच तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडील अहवालातून दिसून येते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज