टीम मंगळवेढा टाईम्स । कर्नाटक राज्यातून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामार्गे ओझेवाडीकडे जाणारा बेकायदा 15 लाख 81 हजार 958 रुपये किमतीचा गुटखा तसेच 5 लाख 40 हजाराचे वाहन असे 21 लाख 21 हजार 958 रुपयांचा एकूण मुद्देमाल छापा टाकून अन्न औषध प्रशासन विभागाने पकडला आहे.
दरम्यान,या प्रकरणी चालक अमर राजू पवार,सुरज शंकर गवळी,गणेश सदाशिव भोसले(सर्व रा.अकलूज) या तीघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी, महाराष्ट्र राज्यात शासनाने तरूण युवकांचे हित जोपासण्यासाठी गुटख्यावर बंदी घातली असताना शेजारच्या कर्नाटक राज्यात मात्र खुले आम त्याची विक्री होत असल्याने महाराष्ट्रातील व्यवसायिक तेथे जावून गुटख्याची खरेदी करून अव्वाच्या सव्वा किमतीला गुटखा विकून मालामाल होत आहेत.
गुटखा विक्रीतून मुबलक पैसे मिळत असल्यामुळे व्यवसायिकांना त्याचा मोह कायदा करूनही सुटत नसल्याचे चित्र आहे.दि. 27 च्या पहाटे 5.00 वा. कर्नाटक राज्यातून चोरटया मार्गाने मंगळवेढा शहरातील पोलिसांचा ससेमिरा चूकवून श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना मार्गे ओझेवाडीकडे गुटख्याचे वाहन जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती.
पथकाने मुढवी शिवारात पहाटे 5.00 वा. सापळा लावला असता वाहन अलगद जाळयात सापडले. या वाहनात विमल पान मसाला 40 मोठे पोते,सुगंधी तंबाखू 8 पोती,आर.एम.डी. पान मसाला 320 बॉक्स, एम सुगंधी तंबाखू 320 बॉक्स,सुपर जेम पान मसाला 54 पाकिटे,एस 99 सुगंधी तंबाखू 54 पाकिटे असा एकूण 15 लाख 81 हजार 958 रुपये किमतीचा माल पकडण्यात आला.
5 लाख 40 हजार रुपयांचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. याची फिर्याद अन्न व औषध प्रशासनचे मंगेश लवटे यांनी दिल्यानंतर वरील तीन आरोपीविरूध्द भा.दं.वि.188,272,273 अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Gutka worth Rs 15 lakh 81 thousand seized on Tuesday; Crimes filed against the three
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज