टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी बारामती-इंदापूरला पळविणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उजनी धरण संघर्ष समितीने काल पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात आंदोलन केले.
आंदोलनाचा भाग म्हणून नदीपात्रात पालकमंत्री भरणे यांच्या नावाने म्हसोबाची स्थापना करीत आंदोलकांनी पालकमंत्री भरणे यांचा निषेध केला.
आंदोलनासाठी उजनी धरण संघर्ष समितीच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. उजनीचे पाणी इंदापूर-बारामतीला नव्याने नेण्यात येत आहे.
पाच ‘टीएमसी’ पाणी नेण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला होता. मात्र, सोलापूरकरांच्या संतापापुढे नमते घेत तो निर्णय राज्य सरकारला रद्द करावा लागला.
आता जुन्या योजनेच्या नावाखाली साडेसातशे हॉर्सपॉवरच्या चार मोटारींच्या माध्यमातून उजनी धरणातून चोवीस तास पाणी उचलण्यात येत आहे, असा आरोप समितीचे अतुल खुपसे यांनी केला आहे.
सोलापूरकरांना कोणतीही कल्पना नसताना अशाप्रकारे पाण्याची चोरी सुरू आहे. झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालण्यासारखा हा प्रकार आहे.
अवाढव्य मोटारींच्या माध्यमातून एका सेकंदाला लाखो लिटर पाणी चोरण्यात येत आहे, असा आरोप खुपसे यांनी केला.
या साऱ्या प्रकारामागे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच आहेत. सोलापूरचे पालकमंत्री असताना ते केवळ बारामती व पवारांच्या हितासाठी काम करीत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघासाठी काम करीत आहेत, असा आरोप खुपसे यांनी केला. उजनी धरण ज्यांच्यासाठी बांधण्यात आले.
ज्यांनी धरणासाठी घरे-दारे जमीनी आणि आपली गावे सोडली त्यांना पाणी देण्याऐवजी पवारांच्या दबावाखाली बारामती व इंदापूरला पाणी पळविण्यासाठी पालकमंत्री भरणे मदत करीत आहेत.
करमाळा, माढा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यावर हा अन्याय आहे. विशेष म्हणजे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तेच पाण चोरण्यासाठी मदत करीत आहेत, असे खुपसे यांनी सांगितले.
काल आंदोलनाला सुरवात झाली आहे. आज चंद्रभागेत भरणेमामांच्या नावाने म्हसोबाची स्थापना करून आंदोलन केले. आज आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.
सोलापूरच्या जलसंपदा कार्यालयाला वेढा घालून उद्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे खुपसे यांनी सांगितले. सरकारने उजनीतील या पाणी चोरीला पायबंद न घातल्यास चंद्रभागेचे पाणी लाल होईल, असा इशारा खुपसे यांनी दिला आहे.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज