टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्यानं राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
यावेळी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कुणीही राजकारण करू नये. अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मास्क वापरत नाहीत हे घातक आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून याबाबत चर्चा केली जाणार आहे असं सांगत अजित पवार यांनी राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. या बैठकीत कोरोना संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता? असा सवाल करुन राजकारण करायला सुरुवात केली.
पण कोरोना वाढतोय त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे या विषयावर राजकारण करुन लोकांना कुणी भावनिक करू नये, असं अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनाही नियम घालून दिले पाहिजेत, असंही ते पुढे म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज