टीम मंगळवेढा टाईम्स।
चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य अर्थात रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार आहे.
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येईल.
वस्त्रोद्योग विभागाने 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना आखली आहे.
ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पात्र कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक या प्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.
ही योजना राज्य यंत्रमाग महामंडळ राबविणार असून 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे.
या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात येईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज