मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल शरद पवार नाशिकमध्ये होते. अजित पवार यांच्या गटात सहभागी झालेल्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात त्यांनी सभा घेतली.
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असा दोन्ही गटांचा दावा आहे. सध्या हा विषय निवडणूक आयोगाकडे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार यांचा गट वजनदार दिसतोय. त्यांना बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. यातल्या बहुतांश आमदार, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहेत.
पुतण्याच्या बंडासमोर हार नाही मानली
पुतण्याच्या बंडासमोर शरद पवार यांनी हार मानलेली नाही. ते नव्या ताकदीने, उमेदीने कामाला लागले आहेत. राजकीय आयुष्यात माझ्यासमोर पहिल्यांदा अशी स्थिती नाही. याआधी सुद्धा मी अशा परिस्थितीतून गेलोय. त्यामुळे मी पुन्हा उभा राहणार असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवलाय. ते कामाला सुद्धा लागले आहेत.
बंडानंतरची शरद पवार यांच्यावर आतापर्यंतची जहरी टीका
शरद पवार यांची राजकीय कोंडीची स्थिती बघून त्यांचे राजकीय विरोधक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयत. भाजपा सोबत असलेले माजी मंत्री आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार जहरी टीका केली आहे. आतापर्यंतची शरद पवार यांच्यावर केलेली ही जहरी टीका केली.
‘पाप फेडावे लागत आहे’
शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे” असे शब्द सदाभाऊ खोत यांनी वापरले आहेत.
‘गवताच्या कांडया तुटून पडतील’
“हा सैतान पुन्हा गावगाड्यात येऊ नये आणि पुन्हा नवे सरदार बनवू नये. यासाठी लढाई लढावी लागेल. शरद पवार यांच्या कालखंडात सरंजामशाही, 50 वर्ष महाराष्ट्रात अंमल होता” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी गवताचा भारा विस्कटला, आता गवताच्या कांडया तुटून पडतील” असं ते म्हणाले.
काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती, पण आता….
“पुतण्यापासून मला वाचवा अशी नवीन हाक आता महाराष्ट्रला ऐकू येत आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती” असं सदाभाऊ खोत म्हणाले. शरद पवार यांच्यावर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची इस्लामपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज