टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह सत्ताधारी गाव विकास आघाडीच्या पाच सदस्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश निर्गमित केल्याने मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील पंचवार्षिक कालावधीत स्वाभिमानी परिवाराचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय पवार यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देत जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून देऊन गावचा लौकिक उंचावला होता.
त्यांची राजकीय घौडदौड रोखण्यासाठी तालुक्याच्या राजकीय पटलावरील परिचारक, काळुंगे, बामसेफ, शेतकरी संघटना तसेच स्थानिक लतिफ तांबोळी गटाने एकत्र येत गावविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत मिळवले होते.
या निवडणूकीतील सत्ताधारी गटाच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य तीन सदस्यांनी विहीत रीत व नमुन्यात खर्च सादर केला नसल्याची तक्रार युवा आघाडीचे कार्यकर्ते बालाजी पवार यांनी दाखल केली होती.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी या हेतूने राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरुन निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना
या नियमांचे उल्लंघन झाले असून या पाच सदस्यांनी रोखीने खर्च केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी 7 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने जिल्हाधिकार्यांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
दि. 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सरपंच सचिन घुले, मिनाक्षी सुर्यवंशी, अंजना चौधरी, सुमन गणपाटील, दिक्षा शिवशरण या सदस्यांना आदेशाच्या दिनांकापासून अपात्र घोषित केले असून पुढील पाच वर्षे सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निर्बंध घातले आहेत.
सत्ताधारी गटाच्या या सदस्यांना अभय मिळवून देण्यासाठी भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेलचे लतिफ तांबोळी यांनी कंबर कसली होती.
मात्र राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी एकाकी खिंड लढविताना आपले प्रशासकीय नैपुण्य सिद्ध करीत या सदस्यांना अपात्र घोषित करुन पहिल्या टप्प्यातील राजकीय लढाई जिंकली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज