मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या विरोधातील दीपक पवार व डॉ. बी. पी. रोंगे हे आता आमने-सामने येणार आता स्पष्ट झाले आहे. छाननीमध्ये दोघांचे ही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवले आहेत.
पवार व रोंगे यांच्या उमेदवारी अर्जामुळे कारखान्याची निवडणूक अधिक रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे. रोंगे, पवार यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याने काळे गटाला पहिला धक्का बसल्याचे मानले जाते.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण २६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यामध्ये परस्पर दोन्ही गटांनी एकमेकांच्या उमेदवारांवर आक्षेप नोंदवले होते.
यामध्ये प्रामुख्याने दीपक पवार, बी. पी. रोंगे, धनंजय काळे, कल्याणराव काळे यांचा समावेश होता. निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी आज वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये हरकत घेण्यात आलेल्या दीपक पवार, बी. पी. रोंगे, कल्याणराव काळे यांच्यासह १७७ उमेदवारी अर्ज मंजूर झाले तर ९२ जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले
पाटील, रोंगे पवार गटाचे अर्ज मंजूर झाल्याने निवडणूक चुरशीने होणार हे आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचे जाहीर होताच दीपक पवार व डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. पाच जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.(स्रोत:सकाळ)
हा तर लोकशाहीचा विजय आहे
सुरवातीपासूनच कल्याणराव काळे यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान सुरू केली आहे. पहिल्यांदा मतदार यादीतून माझे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन लढाईत माझे नाव पुन्हा मतदार यादीत आले.
मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळीही माझ्या अर्जावर आक्षेप नोंदवण्यात आला. जाणूनबुजून लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता.
तरी शेवटी सत्याचा विजय झाला. निवडणुकीत सभासद योग्य निकाल देतील, असा विश्वास दीपक पवार यांनी व्यक्त केला आहे.
आमच्या पुढे विरोधकांचे आव्हान नाही
कारखाना निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसारच अर्ज अवैध ठरविले आहेत. आम्ही कोणाचेही अर्ज बाद केले नाहीत. लोकशाहीमध्ये निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार आहे.
गेली २२ वर्षे प्रामाणिकपणे कारखान्याचा कारभार केला आहे. इतक्या वर्षात कधीही ऊस बिल थकले नाही. परंतु दोन वर्षांत आर्थिक अडचणी आल्यामुळे थोडासा विलंब झाला आहे.
तरीही मार्ग काढून वेळेत बिल देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांनी एकत्रित निवडणूक लढवली तरी आमच्यासाठी ते आव्हान नाही. सभासद आमच्या कामाला पसंती देतील, असा विश्वास कल्याणराव काळे यांनी व्यक्त केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज