टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा तालुक्यात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता एकाच वेळेला, एकाच दिवशी, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर खा. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत.
दोन्ही सभांची तयारी सुरू आहे. अशात गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने माढा पोलिसांना निवेदन देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण पडणार आहे.
हेलिपॅडचे काम पूर्ण; कारखान्यावर मंडप उभारणी सुरु
■ पिपळनेर येथील आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलराव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमाची देखील तयारी सुरु झाली आहे. कारखान्याच्या समोरील मैदानावर मंडप लावण्यात येणार आहे. साइडलाच पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
■ कापसेवाडी येथे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार आहे, या मेळाव्याची जय्यत तयारी कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष व आयोजक नितीन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सुरु असून सध्या मंडप उभारणी काम हे अर्ध्यावर आले असून हेलिपॅडचे काम पूर्ण होत आले आहे.
मंडप दोन एकरांवर असून त्या शेजारी असणाऱ्या तीन एकरांच्या द्राक्षबागेतही शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध एलसीडी स्क्रीन देखील लावण्यात येऊ लागले आहेत, पार्किंग व्यवस्था, शेतकरी स्टॉलची देखील तयारी झाली आहे.
अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल
माढा सकल मराठा समाजाच्या वतीने माढा पोलिस स्टेशनला दि. १८ ऑक्टोबर रोजी ११:१० वा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखाना दौयाला विरोध असल्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. मराठा आरक्षण द्या, मगच तुमचे दौरे करा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तसे न झाल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज