टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठक झाली.
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांच्या शिष्टमंडळाने आषाढी वारीतील सर्व दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती.
वारकरी दिंड्यांना अनुदान जर दिले नाही, तर वेळप्रसंगी वारकरी संघटना वारी दिंड्या पालख्या थांबवून आंदोलन करतील, असा इशारा वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी ९ जून २०२३ रोजी दिला होता. यानंतर आषाढी यात्रेसाठी सोहळा वारकरी संघटना आणि वारकरी साहित्य परिषद सरकारकडे असलेल्या दिंडी अनुदानाच्या मागणीचा पाटील सतत पाठपुरावा करत होते.
शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारकऱ्यांसह विठ्ठल पाटील यांनी भेट घेतली. यावेळी वारकऱ्यांना दिंडी अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. या अनुदानाच्या निर्णयाबाबत वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी आणि वारकऱ्यांमधून स्वागत होताना दिसत आहे.
आषाढी वारीत दर्शन रांगेतील भाविकांना मिळणार लिंबूपाणी अन् पाणी बॉटल
आषाढी एकादशी यात्रा काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत लिंबूपाणी तसेच १ लिटर पाणी बॉटल देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारी नियोजनाबाबत पुण्यात बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही व्यवस्था केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्या दृष्टीने सर्व नियोजन केल्याची माहिती यावेळी आशीर्वाद यांनी सादर केली.
पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार केले.
याप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा. इंद्रायणी नदी स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करा, पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन आतापासूनच करा, लागून असलेल्या जागा सोहळ्याच्या दृष्टीने करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज