टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरीचा पांडुरंग, अक्कलकोटचे स्वामी समर्थ व तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात येतात.
राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढल्याने परराज्यांतील वाहनांची संख्या देखील वाढली आहे.
पण, अशा वाहनांना विनाकारण अडवून आमचा कर्मचारी त्रास देत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा नूतन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे.
राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात मोठी वाढ होत असून, सोलापूर सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये टॉप टेनमध्ये आहे. अपघात रोखण्यासाठी विशेष काम केले जाईल.
अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ उपचार मिळावेत, यादृष्टीने काम केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वाहतुकीला स्वयंशिस्त लावण्यावर अधिक भर दिला जाईल. विनाकारण कोणी अडवून परराज्यातील किंवा तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने अडवून त्रास देत असल्यास त्याची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, जनताभिमुख पोलिसिंगवर अधिक भर राहील. अपघात होऊ नयेत म्हणून जनजागृती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील शांतता- सुव्यवस्था अबाधित राहील, यादृष्टीने नियोजन असेल.
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या माध्यमातून एक वेगळा सामाजिक बदल घडविणारा उपक्रम राबविला; तो तसाच कायम ठेवून अधिक गतीने काम केले जाईल, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र, पोलिस ठाण्यांमधील अंतर आणि उपलब्ध मनुष्यबळ यात तफावत आहे. तरीपण, चांगले पोलिसिंग करून गुन्हेगारी रोखण्यावर सर्वाधिक भर राहील.
सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच प्रामुख्याने प्रिवेंशन, डिटेक्शन व इन्वेस्टिंग यावरच अधिक काम केले जाईल.
अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाई करून थेट गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी यावेळी दिला. (स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज