टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारीनिमित्त मोजक्या पालख्यांना परवानगीची घोषणा केली आहे. पवारांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय कॅबिनेटकडून घेण्यात आला आहे.
या सर्व पालख्या बसमधून जातील. यासाठी राज्य सरकारकडून 20 बस दिल्या जाणार आहेत अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी पालखीला परवानगी मिळणार की नाही यावर संभ्रम होते. तेच दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, की कोरोना काळात आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीची कालच (गुरुवारी) बैठक पार पडली. त्याच समितीने राज्य सरकारला दिलेल्या अहवालावर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या आणि मानाच्या अशा सर्व 10 पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तर शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज