टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या चोऱ्या, घरफोडी, फसवणूक, खून, वाहनचोरी अशा विविध गुन्ह्यांचा तपास होत नसल्याने पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी डीबीचे पथक बरखास्त केले आहे.
या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांची बीट अंमलदार म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे एरवी साध्या वेशात डीबीचे पोलीस म्हणून रुबाबात फिरणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांचा तोरा उतरला आहे.
सांगोला पोलीस स्टेशन अंकित कटफळ , नाझरे , कोळा , घेरडी असे चार औट पोस्ट व एखतपूर , वाढेगाव आणि शहर बीट कार्यरत आहेत.
लोकसंख्या वाढत असताना दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच सांगोल्यातून राष्ट्रीय महामार्ग , राज्य मार्ग गेले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
सांगोला पोलीस स्टेशनला दैनंदिन दाखल होणारे गुन्हे, चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोरी, फसवणूक या गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल व्हावी म्हणून पोलीस स्टेशनअंतर्गत डीबी पथकाची नियुक्ती केली जाते.
दरम्यान, सांगोला पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या प्रलंबित गुन्ह्यांची उकल ( तपास ) होत नसल्यामुळे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी डीबी पथक बरखास्त केले.
यापूर्वी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोला पोलीस स्टेशनला भेट देऊन दप्तर तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या दरम्यान पत्रकारांनी तालुक्यातील बाळूचोरी, घरफोडी, विविध गुन्ह्यांचा तपास होत नसल्याचे प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, सातपुते यांनी पोलीस निरीक्षक यांना प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्याच्या सूचना केल्या होत्या.याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी डीपीचे पथक बरखास्त केल्याचे सांगितले जाते.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज