मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यातील सर्वच पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा, अशी सूचना प्रशासनाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पाणंद आणि शेतरस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.
जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ ८ ते १० लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनवण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी.
तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.
मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार
पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल, असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्यांच्या नंबरिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून मंत्री बावनकुळे यांनी शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये, यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज