टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या लढाईत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स यासोबतच आता कोरोना लसीचेही महत्त्व सर्वसामान्यांना पटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी सोलापूर जिल्ह्याला 12 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 हजार डोस महापालिका हद्दीसाठी तर नऊ हजार डोस ग्रामीण भागासाठी आहेत.
आजपासून पुढील पाच दिवस ऑनलाइन पद्धतीने नोंदणीद्वारे अपॉइंटमेंट घेऊन 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू होणार आहे.
नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण होणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनची सोय नसल्याने ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांनी निवडलेल्या सत्रात वेळेत उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा.
यामध्ये 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना लसीकरण होणार नसल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
8 ते 12 मे या पाच दिवसांमध्ये सोलापूरच्या ग्रामीण भागात नऊ हजार जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे व बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्र,अक्कलकोट तालुक्यामध्ये जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, बार्शी तालुक्यातील वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, करमाळा तालुक्यातील कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्र,
सांगोला तालुक्यातील अकोला प्राथमिक आरोग्य केंद्र, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालय, मोहोळमधील ग्रामीण रुग्णालय, माळशिरस तालुक्यातील अकलूज ग्रामीण रुग्णालय व
नातेपुते ग्रामीण रुग्णालय अशा दहा ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. 8 ते 12 मे या कालावधीत या दहा ठिकाणी दररोज अठराशे जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.
नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार
लसीकरणासाठी लाभार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची गर्दी गोंधळ करू नये. ज्या सत्रात नोंदणी केली आहे त्याच सत्रात लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. कोरोना नियमाचे पालन करून शांततेत व शिस्तीत नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज