मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच चेन्नईने गुजरात टायटन्सला 5 विकेट्सने पराभूत केले.
चेन्नई सुपर किंग्सचे हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. त्यांनी यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या हंगामात विजेतेपद जिंकले आहे. यासह चेन्नईने मुंबईच्या पाच आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
हा सामना रविवारी (२८ मे) होणार होता. मात्र, रविवारी अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी राखीव दिवशी हा सामना हलवण्यात आला. पण सोमवारीही पावसाचा व्यत्यय आल्याने चेन्नई सुपर किंग्ससमोर पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला 10 धावांची गरज होती.
यावेळी चेन्नईकडून रविंद्र जडेजा फलंदाजी करत होता. तसेच गोलंदाजी गुजरातकडून मोहित शर्मा करत होता. जडेजाने या दबावाच्या परिस्थितीतही षटकार आणि मग विजयी चौकार मारला. यासह चेन्नईने हा सामना जिंकत पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले.
या सामन्यात चेन्नईची फलंदाजी सुरू झाल्यावर ३ चेंडूंनंतर पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवावा लागला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकात चेन्नईसमोर १७१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.
पावसाच्या अडथळ्यानंतर सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर चेन्नईकडून ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चांगली सुरुवात दिली. या दोघांनीही आक्रमक खेळताना अर्धशतकी भागीदारीही रचली. मात्र, त्यांची भागीदारी ७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराजला बाद करत तोडली. याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नूर अहमदने कॉनवेला पण बाद केले.
ऋतुराजने २६ धावांची आणि कॉनवेने ४७ धावांची खेळी केली. या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांची जोडी जमली होती. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच रहाणे १३ चेंडूत २७ धावा करून बाद झाला.
पण नंतर अखेरच्या सामन्यात फलंदाजीला उतरलेल्या रायुडूनेही आक्रमक खेळ केला. पण तोही ८ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. त्याला मोहित शर्माने १३ व्या षटकात बाद केले. मोहितने रायुडू पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर एमएस धोनीलाही शुन्यावर बाद केले. त्यामुळे सामना रोमांचक वळणावर आला होता. पण शिवम दुबे आणि जडेजाने गुजरातला आणखी यश मिळू दिले नाही.
अखेरच्या षटकामध्ये १३ धावांची गरज होती. यावेळी दुबेसह रविंद्र जडेजा फलंदाजी करत होते. या दोघांनाही पहिल्या चार चेंडूत तीन धावाच घेता आल्या होत्या. पण अखेरीस जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारल आणि चेन्नईला विजय मिळवून दिला.
दुबे २१ चेंडूत ३२ धावांवर नाबाद राहिला, तर जडेजा ६ चेंडूत १५ धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून मोहित शर्माने ३ विकेट्स आणि नूर अहमदने २ विकेट्स घेतल्या
तत्पुर्वी, या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा हे सलामीला उतरले होते. या दोघांनीही गुजरातला दमदार सुरुवात करून देताना अर्धशतकी भागीदारीही रचली. त्यातच शुभमन गिल 3 धावांवर असताना त्याचा दीपक चाहरकडून झेल सुटला होता. पण ही चूक फार महागात पडली नाही.
कारण 7 व्या षटकात फिरकीपटू रविंद्र जडेदाच्या गोलंदाजीवर तो 39 धावांवर बाद झाला. त्याला यष्टीरक्षक एमएस धोनीने यष्टीचीत केले. त्यामुळे गिल आणि साहा यांच्यातील 67 धावांची भागीदारीही तुटली.
पण नंतर वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी डाव सावरला. दोघांनीही आक्रमक खेळ केला. पण साहा अर्धशतक केल्यानंतर १४ व्या षटकात बाद झाला. त्याला दीपक चाहरने बाद केले. साहाने ३९ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतरही हार्दिक पंड्याने दुसऱ्या बाजूने सुदर्शनला भक्कम साथ दिली. या दोघांमध्ये केवळ ३३ चेंडूत ८१ धावांची भागीदारी झाली.
सुदर्शन एका बाजूने आक्रमक खेळ करत होता. मात्र, तो ९६ धावांवर असताना त्याला अखेरच्या षटकात मथिशा पाथिरानाने पायचीत पकडले. सुदर्शनने ४७ चेंडूत ही खेळी करताना ८ चौकार आणि ६ षटकार मारले.
अखेरच्या चेंडूवर राशीद खानही बाद झाला. हार्दिक १२ चेंडूत २१ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २१४ धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पाथिराने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज