टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यासाठी जाहीर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अर्थात् मिलेट सेंटर बारामतीला पळविण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी जाहीर केला.
तेलंगणा, मध्यप्रदेशातील निवडणुकीत व्यस्त असलेल्या भाजप, काँग्रेसच्या आमदारांना शनिवारी या निर्णयाची भणकही नव्हती. काही जणांनी प्रतिसाद देण्याची तसदीही घेतली नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महाराष्ट्र श्री अभियान राबविण्याची घोषणा केली.
तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देणे व इतर विविध कामांसाठी सोलापूर जिल्ह्यात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची सूचना केली होती.
दरम्यान, सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याची सर्वस्वी जबाबदार भाजपची आहे. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.(स्रोत:लोकमत)
मंजूर झालेले केंद्र इतरत्र घेऊन जाऊ देणार नाही
बारामतीला घेऊन जायचा प्रश्नच नाही. जिल्ह्यासाठी मंजूर झालेले केंद्र इतरत्र घेऊन जाऊ देणार नाही. आम्ही यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. आमदार समाधान आवताडे
निर्णयाला तीव्र विरोध
ज्वारी, मालदंडी, बाजरीचा हा जिल्हा आहे. तसाच तो तृणधान्याचा जिल्हा आहे.आमचा राज्य सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध आहे. -अभिजित पाटील, पंढरपूर.
राजीनामा द्यायची वेळ आली तर देईन, पण हे केंद्र सोलापुरातून जाऊ देणार नाही.
दोनच दिवसांपूर्वी मी या केंद्रासाठी होटगी स्टेशन येथे तातडीने काम सुरू करावे या मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले होते. केवळ सत्तेत आहोत म्हणून अजितदादांनी बारामतीला हे केंद्र घेऊन जाणे बरोबर नाही. आमचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे.
हे होऊ देणार नाही. जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांना बोललो आहे. मला राजीनामा द्यायची वेळ आली तर देईन, पण हे केंद्र सोलापुरातून जाऊ देणार नाही. सगळं बारामतीला घेऊन जायची प्रथा काढली आहे का? – आमदार सुभाष देशमुख
आमदार या विषयावर एकत्र येतील
माझा याला विरोध आहे. माझ्यासह भाजपचे सर्व आमदार या विषयावर एकत्र येतील. सोलापुरातच हे केंद्र झाले पाहिजे. तसा निर्णय होत नसेल तर काय करायचे हे आम्ही ठरवू, -खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य
प्रशिक्षण केंद्रही आम्ही सोलापुरात परत आणू
माझे प्रशासनाशी बोलणे झाले. हा कृषी खात्याचा प्रकल्प आहे. ते सोलापुरातच राहणार आहे. या योजनेतील ४२ कंपन्यांना प्रशिक्षण देण्याचे काम हैदराबाद येथील आयआयएमआर संस्थेकडून केले जाते. सोलापुरात असलेल्या संस्थेच्या या सेंटरमध्ये साधनसामग्री कमी आहे. बारामतीत व्यवस्था आहे. केवळ प्रशिक्षणाचे सेंटर बारामतीला गेले आहे. अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच उभारल्यानंतर हे प्रशिक्षण केंद्रही आम्ही सोलापुरात परत आणू, – आमदार सचिन कल्याणशेट्टी
हा झाला असता लाभ
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असता, पीक प्रात्यक्षिके सादर करता आली असती. शेतीत यांत्रिकीकरण वाढले असते, तृणधान्य मूल्य साखळी विकास प्रकल्पात कामे करणारे शेतकरी, शेती उत्पादन कंपन्यांना प्रशिक्षण मिळाले असते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज