मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पाच दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत. लोकशाही मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.

अशावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत असलेले दीडशेहून अधिक मराठा आमदार काय करत आहेत? असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला.

या सगळ्या आमदारांनी आपले राजीनामे जरांगे पाटील यांच्या चरणी अर्पण केले पाहिजेत, समाजासाठी एवढं तर करू शकता ना? असा टोलाही त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना केला.

इम्तियाज जलील यांनी आज आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. सरकार न्यायालयाच्या आडून मनोज जरांगे यांचे आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी आम्ही या लढ्यात खांद्याला खांदा लावून सोबत असल्याची ग्वाही देखील दिली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार मुद्दाम रखडवत असल्याचा आरोप करताना या लढ्यापासून लांब राहणाऱ्या मराठा आमदार, खासदारांनाही फटकारले. महाराष्ट्राच्या विधानसभेत असलेल्या मराठा आमदारांपैकी शंभर जणांनी जरी आपले राजीनामे दिले, तर फडणवीस दहा दिवसात निर्णय घेतील, असा दावाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षण मागणीला एमआयएमने सुरूवातीपासून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अगदी अंतरवाली सराटीत जाऊन इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला होता.

आमचे मोठे भाऊ म्हणून आधी तुमच्या लढ्यात आम्ही सहभागी होऊ, नंतर मुस्लिम आरक्षणासाठी भांडू अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याचे कौतुक करत त्यांनी संपूर्ण समाजाला एकत्र आणल्याचे म्हटले होते.

मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. एवढेच नाही तर मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या जेवणाची, पाण्याची सोय देखील केली होती.
त्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी मुंबईत गाठत आंदोलनस्थळी भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देतानाच त्यांनी मराठा आमदारांना चांगलेच सुनावले.
‘तुम्हाला करायचं की नाही करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे .जेव्हा तुम्हाला काही करायचं नसतं तेव्हा तुम्ही समिती गठीत करता. समितीवर समिती हे धंदे सुरू आहेत, काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं. अपेक्षा ही होती की उच्च न्यायालयाने हे आदेश सरकारला द्यायला पाहिजे होते.
या लोकांची मागणी नक्की काय आहे ? मागच्या एवढ्या वर्षांपासून हे लोक रस्त्यावर उतरत आहेत लढत आहेत. आंदोलन करत आहेत, मग त्यांना न्याय का मिळत नाही ? हे हायकोर्टाने सांगायला पाहिजे होते, अशी आमची अपेक्षा होती .'(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











