टीम मंगळवेढा टाईम्स ।
२०१९ मध्ये मंगळवेढा तालुक्यातील जनावरांना चारा मिळावा यासाठी सुरू केलेल्या चारा छावण्यांची प्रलंबित ३८ कोटींची बिले पाच वर्षे उलटत आली तरीसुद्धा मिळाली नसल्यामुळे छावणीचालक आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आले आहेत.
शासनाकडे प्रलंबित बिलासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समस्त छावणी चालकांकडून बहिष्कार टाकून कुटुंबातील सदस्यांसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा संबंधित छावणी चालकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी कडून राम सातपुते तर काँग्रेस कडून प्राणिती शिंदे लोकसभेच्या रिंगणात उभे राहिले असून या दोघांपैकी छावणी चालकांना कोण नाही मिळवून देणार याकडे संपूर्ण जिल्हा वाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एप्रिल २०१९ मध्ये मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनावरांना चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी शासनाने नियमानुसार प्रक्रिया राबवून मंगळवेढा, सांगोला तालुक्यात चारा छावण्या सुरू केल्या होत्या.
या छावणीच्या मालकांनी एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या सात महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील जनावरांना चारा छावणीच्या माध्यमातून चारा पुरवून हजारो पशुधन वाचवण्याचे काम केले होते.
यातील काही महिन्याचे बिल छावणी चालकांना मिळाले; ही बिले मिळण्यासाठी सांगोला येथे सांगोला मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांनी सलग दोन महिने आंदोलन केले होते. यावेळी अनेक नेत्यांनी प्रलंबित बिले तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे बिलाच्या संदर्भात १० ऑक्टोबर २०२३ रोजी बैठक होऊन उपायुक्त पुरवठा विभाग यांना बिले तातडीने देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत उपायुक्त यांच्याकडून गेल्या सहा महिन्यापासून तपासणी सुरूच असून याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे दिला गेला नाही.
छावणी चालकांनी छावण्या चालवण्यासाठी बँका, पतसंस्था, खासगी सावकारी कर्ज, घरचे सोने दागिने विकून छावण्या चालवल्या. प्रलंबित बिलामुळे अनेक छावणी चालक उघड्यावर आले असून कर्जरुपी देण्यामुळे तोंड चुकवण्याची वेळ आली आहे.
आर्थिक चक्रात अडकलेल्या छावणी चालकांच्या मागणीकडे महाविकास आघाडी व महायुती सरकारने दुर्लक्ष केले आहे. २०२०-२१ मध्ये कोरोनाचा कालावधी असल्याने यादरम्यान बिलाबाबत कोणती हालचाल झाली नाही.
परंतु त्यानंतर छावणी चालकांकडून बिलासाठी पाठपुरावा सुरू राहिला. सरकारकडून मात्र ही बिले जुनी असल्याचे कारण सांगत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या छावणी चालकांकडून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाणार असून प्रलंबित बिलासाठी मुलाबाळांसह कुटुंब रस्त्यावर उतरून आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर पप्पू स्वामी, नीलेश आवताडे, विष्णू मासाळ, सिद्धेश्वर कदम, बंडू लवटे, अशोक लेंडवे, देविदास इंगोले, नामदेव जानकर, तानाजी कांबळे, गौडप्पा बिराजदार आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, राम सातपुते अथवा प्रणिती शिंदे यांनी छावलीचकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर बिल काढून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचे छावणी चालकांनी जाहीर केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज