मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला यंदा 6 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहिती सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेनिमित्त अभिनेता भरत जाधव आणि अभिनेता विजय कदम सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सिनेअभिनेते भरत जाधव, सिनेअभिनेते विजय कदम, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
यावेळी कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे, श्रीदेवी फुलारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धा सकाळी आठ ते सायंकाळी नऊ यावेळेत होणार असून महाराष्ट्राच्या विविध भागातील 41 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचा लाभ सोलापूर शहर व जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला प्रमुख कार्यवाह प्रा. ज्योतिबा काटे, सहकार्यवाह सुमीत फुलमामडी, सुहास मार्डीकर, कार्यकारणी सदस्य अशोक किल्लेदार, शांता येळंबकर, निमंत्रित सदस्य राजू रंगम आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज