मंगळवेढा : समाधान फुगारे
छोट्या मोठ्या आर्थिक गरजांसाठी महिलांनी परावलंबी न राहता बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे असे आवाहन मंगळवेढा पंचायत समिती च्या सभापती सौ प्रेरणा मासाळ यांनी केले.
मरवडे येथील ग्रामसचिवालयाच्या भव्य वास्तूमध्ये गावातील बचत गटांच्या ग्रामसंघासाठी बचत भवनाचे उदघाटन सभापती सौ. मासाळ यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी त्या बोलत होत्या. अर्थकारण ही पुरुषांची मक्तेदारी होती, मात्र महिला बचत गटांमुळे स्रिया स्वावलंबी होत असून त्यामुळे आर्थिक निर्णयांचे स्वातंत्र्य देखील महिलांना प्राप्त झाले आहे. छोट्या मोठ्या लघुउद्योगाची कास धरुन महिलांनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य निर्माण करुन द्यावे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी महिला सबलीकरणासाठी बचत गटाची चळवळ अधिक व्यापक व्हावी , महिलांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्याला संधी मिळावी असे आवाहन ही त्यानी केले.
यावेळी व्यासपीठावर उपसरपंच विजय पवार , हुलजंतीचे माजी सरपंचसुधाकर मासाळ , प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ.वंदना जाधव, तंटा मुक्तीच्या माजी अध्यक्षा सौ.साधना जाधव, विकास दुपारगुडे, ग्रामसेवक जे.पी. भांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शोभा वाघ होत्या. यावेळी सौ.मिराताई इंगळे, सुधाकर मासाळ , सौ.रेश्मा बटवेगार, सौ. बानू मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. मरवडे ग्रामपंचायतीने कार्यालयासाठी इमारत उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व महिलांनी ग्रामपंचायतीस धन्यवाद दिले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कूंकू, तिळगूळ वाटप व वाणवस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुमुदिनी चव्हाण यांनी केले तर शेवटी सौ. सायली जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कु. निर्मला पडवळे, सौ.सुवर्णा मस्के यांनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज