मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अद्यापही पक्षाने नव्या जिल्हाध्यक्षांची निवड केली नाही.
एकीकडे शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यासाठी तीन-तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक केली आहे. मात्र, भाजप अद्याप एकाही जिल्हाध्यक्षांची निवड करू शकला नाही. नव्या अध्यक्षांची निवड करताना निष्ठावंतांना संधी मिळणार की नव्याने आलेल्यांवर पक्षाची जबाबदारी सोपविणार याबाबत श्रेष्ठींच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना दोन टर्म जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात पक्षाला चांगले दिवस आले आहेत.
देश, राज्य व जिल्ह्यातही पक्षाला सत्ता संपादन करता आली. पक्षाने शहराध्यक्षपदाची निवड केली आहे. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत चालढकल केली जात आहे. 12 फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजीमंत्री विजयकुमार देशमुख हे जिल्हाध्यक्ष होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशिवाय आमदार सचिन कल्याणशेट्टी, सांगोल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख, बोरगावचे राजकुमार पाटील यांच्या नावाची चर्चाही जिल्हाध्यक्षपदासाठी सुरू आहे. त्यामुळे यापैकी कोणाची वर्णी लागणार की नव्याच चेहऱ्याला संधी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज