मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जगाचा पोशींदा जगला पाहीजे, शेतीमधील काही कळत नसेल तर मला शेतकऱ्यांचे अश्रु कळतात, अशा शब्दांत मागील निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती देण्यात आली. मात्र, हे करीत असताना आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.सात) व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक यांच्यासोबत संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.
अत्यंत कमी दिवसात कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची तयारी केली, त्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी करतांना येणाऱ्या लहान लहान तांत्रिक समस्यांचेही निराकरण करणे महत्वाचे असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांची एकच झुंबड होईल. अशा वेळी योग्य ते नियोजन करावे व शेतकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधावा, त्यांचे म्हणणे ऐका, अडचणी दूर करा, कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत, अशा भूमिकेतून मदत करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरु असून प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या 35 दिवसांत केले. कामाचा हा वेग असाच टिकवून ठेवा, योजनेतील 88 टक्के पात्र शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड झाला आहे. आत्तापर्यंत 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंद झाली असून 95 टक्के आधार जोडणी पूर्ण झाली.
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आता आपले सरकार केंद्र, बॅंका, रेशन दुकानदार यांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष द्यावे, येत्या 21 फेब्रुवारीपासून गावागावात याद्या लावल्या जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज