मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नुकताच सोलापूर दौरा पार पडला. यावेळी त्यांनी पक्ष संघटन आणि आगामी निवडणुकांच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या असल्या तरी दर तीन वर्षांनी होत असलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा सध्या भाजपसाठी कळीचा ठरला आहे. याठिकाणी आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, या निवडीवरून दोन्ही देशमुखांत पुन्हा गटबाजी सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे विश्वासू म्हणून कार्यरत असलेले विद्यमान जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली आहेत.
शहर व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत भाजप पोहोचविण्यासाठीही त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले असले तरी शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या भाजपमध्ये आता नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे शहाजी पवार यांच्या जागी आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा विचार भाजपने केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पुन्हा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख या दोन्ही माजी मंत्र्यांकडून जिल्हाध्यक्षपद आपल्याच गटाकडे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचेही पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडीच्या निमित्ताने दोन्ही देशमुखांतील गटबाजी दिसून येत आहे.
दरम्यान, अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी हे तरुण आमदार असल्याने त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व देण्यासंदर्भातील हालचाली वाढल्या आहेत, तर अनुभवी आणि संयमी असलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यापूर्वी सोलापूर शहराचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. त्यामुळे त्यांनाही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या विचारात भाजपश्रेष्ठी आहेत.त्यामुळे या तिघांना सोडून आणखी काही चेहर्यांची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे सोलापूर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप सांगता येणार नसले तरी जिल्ह्यावर आपले वर्चस्व रहावे यासाठी माजी दोन मंत्र्यांची चढाओढ दिसून येणार आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असून यामध्ये माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यात भाजप वाढण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे इतर उर्वरित तालुक्यांत भाजपची ताकद वाढविण्यासाठी कोण कामी येणार याचाच विचार करून निवड केली जाण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज